मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या (NCP News) एका बाजूला अजित पवार यांच्या अकाली निधनाचे सावट आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी वेगळे वळण घेतले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या साप्ताहिकात लिहिलेल्या एका लेखाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. 12 फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाचा मोठा निर्णय होणार होता, असे संकेत खुद्द शरद पवार यांनी दिले होते. याच काळात शशिकांत शिंदे यांचा हा लेख समोर आल्याने पडद्यामागील हालचाली उघड झाल्या आहेत.

शिंदे यांनी लेखात म्हटले आहे की, विलीनीकरणानंतर ‘दादा’ हेच पक्षाचे सर्वोच्च नेते असतील, असे शरद पवार गटाने निश्चित केले होते. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना मन मोठे करून एकत्र येण्याचे साकडे घातले आहे. या दाव्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, शरद पवार गट लवचिक भूमिका घेण्यास तयार होता.
आमदार रोहित पवार यांनी आपल्याकडे विलीनीकरणाचे ठोस पुरावे असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या गटाने हे दावे फेटाळून लावत रोहित पवारांना आव्हान दिले आहे. त्यावर, “दादांच्या निधनामुळे आम्ही सध्या संयम पाळत आहोत,” असे म्हणत रोहित पवारांनी तुर्तास माघार घेतली असली तरी, संघर्ष संपलेला नाही. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.







