लोणावळा: लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे (Lonavala Shocking News) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने वैवाहिक तणाव किती टोकाला जाऊ शकतो, याची वेदनादायी जाणीव करून दिली आहे. पत्नीशी सुरू असलेल्या वादातून नैराश्यात गेलेल्या 30 वर्षांच्या विरेंद्र सिन्हा यांनी सुमारे 200 ते 250 फूट खोल दरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विरेंद्र हे मूळचे पश्चिम बंगालचे असून सध्या हिंजवडी येथे एका कंटेनर विक्री करणाऱ्या कंपनीत सेल्स विभागात कार्यरत होते. (Latest Breaking News)

माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. 7 फेब्रुवारी रोजी दोघांमध्ये तीव्र भांडण झाले. त्यानंतर 10 फेब्रुवारीला पत्नी माहेरी निघून गेली. 13 फेब्रुवारीला तिचा वाढदिवस होता. मध्यरात्रीपासून विरेंद्र यांनी पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र मोबाईल नंबर ब्लॉक केल्यामुळे संवाद होऊ शकला नाही. पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान त्यांनी पत्नीला मेसेज आणि व्हिडिओ पाठवत आत्महत्येचा इशारा दिला. पत्नीने तत्काळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत उशीर झाला होता.
टायगर पॉइंटवरून उडी घेतल्यानंतर स्थानिक बचाव पथक ‘शिवदुर्ग लोणावळा मित्र’ यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. तीन वर्षांपूर्वीच विवाह झालेल्या या दांपत्याच्या आयुष्यातील हा अंत दुर्दैवी ठरला.
गेल्या आठवड्यातही याच परिसरात एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंटसारखी ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध असली, तरी अशा घटना वारंवार घडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तज्ञांच्या मते, वैवाहिक वाद, नैराश्य आणि मानसिक ताण याकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. संवाद तुटणे हा अनेकदा संकटाचा पहिला टप्पा असतो. अशा प्रसंगी समुपदेशन, कुटुंबीयांची मदत आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे जीवन वाचवू शकते.







