पुणे: गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा, तसेच उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पुणे प्रशासनाने मद्यविक्रीबाबत महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गणेशोत्सवातील काही प्रमुख दिवस तसेच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी गर्दी होते. त्यामुळे सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन काही भागांमध्ये संपूर्ण उत्सव काळात मद्यविक्रीवर बंदी राहणार आहे. खडक, विश्रामबाग आणि फरासखाना या 3 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गणेशोत्सवाचे सर्व 10 दिवस ‘Dry Zone’ जाहीर करण्यात आले आहेत. या परिसरातील मद्यविक्रीची दुकाने, बार आणि परमिट रूम पूर्णपणे बंद राहतील.

14 सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी पुणे शहरात मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात दिवसभर मद्यविक्री बंद राहील.

तसेच 26 सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक पूर्ण होईपर्यंत मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. गणेशोत्सवातील 5 वा आणि 7 वा दिवस यावेळीही ठराविक विसर्जन मार्गांवरील मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका काढल्या जातील, त्या मिरवणुकीच्या मार्गावरील मद्यविक्री अनुज्ञप्त्या संबंधित कालावधीत बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 142 (1) अंतर्गत हे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.






