सासवड : सासवड येथे रस्त्यात कार आडवी लावल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका महिलेसोबत गैरवर्तन करून विनयभंग केल्याचा तसेच तिचे वकील पती अॅड. प्रतीक महेंद्र बसाळे आणि डॉक्टर सासऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात तीन जणांसह ८ ते १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पुणे बार असोसिएशन आणि सासवड बार असोसिएशनने हल्ल्याचा निषेध केला आहे.

ही घटना रविवारी (दि. २०) दुपारी सासवड येथील बसाळे हॉस्पिटलसमोर, सोपाननगर हाडको रोडवर घडली. याप्रकरणी प्राजंली प्रतीक बसाळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश ज्ञानेश्वर काळे, समीर उत्तम काळे आणि हरिश जगदाळे (तिघेही रा. काळेवाडी, ता. पुरंदर) यांच्यासह ८ ते १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.

फिर्यादीनुसार, प्राजंली बसाळे या पतीसोबत हॉस्पिटलकडे जात असताना एमएच १२ वायएक्स ७४७४ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार रस्त्याच्या मधोमध उभी होती. त्यांनी संबंधितांना कार बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर वाद झाला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत अश्लील हातवारे व इशारे केले तसेच शरीराला हात लावून विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

यावेळी अॅड. प्रतीक बसाळे आणि त्यांच्या डॉक्टर वडिलांनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच अन्य ८ ते १० जणांनी जमाव करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर पुणे बार असोसिएशनने अॅड. प्रतीक बसाळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. या प्रकरणातील आरोपी संशयित व्यक्तींचे वकीलपत्र स्वीकारू नये, असे आवाहन असोसिएशनने आपल्या सभासदांना केले आहे.
सासवड बार असोसिएशननेही २१ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत या घटनेचा निषेध केला. आरोपींविरोधात लवकर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच वकिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपींच्या वतीने सासवड न्यायालयात कोणत्याही वकिलाने बाजू मांडू नये, असा ठरावही बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.






