इम्रान आत्तार

भोर : पुणे-महाड मार्गावरील वरंध घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच असून सोमवारी सायंकाळी पाहणीसाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरच डोंगराचा भाग कोसळल्याची थरारक घटना घडली. सुदैवाने प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, सहाय्यक सहकारी आणि पत्रकारांसह संपूर्ण टीम वेळीच प्रसंगावधान राखून बाजूला पळाल्याने झाल्याने अनर्थ टळला.

दोन दिवसांपासून वरंध घाटात, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे घाट क्षेत्रातील शिरगाव, उंबर्डे , धामुनसी, हद्दीत अनेक छोट्या मोठ्या दरडी कोसळल्या होत्या . रस्ता खचला होता , वाहून गेला होता. या दरडीमुळे २० पेक्षा जास्त वाहने आणि ७० ते ८० प्रवासी अडकले होते. युद्धपातळीवर काम करून २० तासांनी सोमवारी सायंकाळी ६ वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र सायंकाळी ७ वाजता हिर्डोशी हद्दीत पुन्हा मोठी दरड कोसळली आणि रस्ता पुन्हा बंद झाला. यावेळी ६ ते ७ गाड्या अडकल्या.
अधिकारीही अडकले, पर्यायी मार्गाने भोरला परतले
दरडी हटवण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन , नायब तहसीलदार वैशाली घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे, पोलिस निरीक्षक निलेश माने, पोलिस पाटील सुधीर दिखे, सुनील भेलके, गोपनीयचे पोलीस अभय बर्गे, हवालदार अजय साळुंखे , पत्रकार विलास मादगुडे,किरण अंबिके,विनय जगताप,दिपक पारठे हे सर्वजण पहाणी करत होते .तसेच स्थानिक नागरिकांनी मदतकार्यामध्ये सहभाग घेतला होता. भोर-महाड मार्गावरील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे भोर आणि महाड या दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. उंबर्ड येथील पवार हॉटेल परिसरात अनेक पर्यटकांची वाहने अडकून पडली होती. दरडींचा मलबा हटविण्याचे काम सुरू असले तरी संततधार पाऊस आणि सतत कोसळणाऱ्या दरडींमुळे रस्ता पूर्ववत महाड तालुक्याच्या हद्दीतही अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने संपूर्ण भागाची पाहणी करत परतत असताना हिर्डोशी येथे त्यांच्यासमोरच दरड कोसळली. त्यामुळे हे सर्व अधिकारी व पत्रकारांची टीम बाजूला पळाले पुढील अनर्थ टळला.प्रसंगावधान राखून सर्वांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर शिरगाव मार्गे साळुंगण-पांगारी या पर्यायी मार्गाने मध्यरात्री १ वाजता सर्वजण भोरला सुखरूप पोहोचले.
व्हिडीओ व्हायरल, प्रशासनाचे आवाहन
डोळ्यादेखत दरड कोसळतानाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलग पावसामुळे वरंध घाटातील डोंगरकडे सुटत असून आणखी दरडी कोसळण्याचा धोका आहे.
पुढील सूचना मिळेपर्यंत वरंध घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.पर्यटक आणि नागरिकांनी वरंध घाट मार्गे प्रवास टाळावा. भोर-मांढरदेवी-वाई किंवा ताम्हिणी घाट या पर्यायी मार्गांचा वापर करावा. दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून हवामानाचा अंदाज घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. वरंध घाटात गेल्या ४८ तासांत दरड कोसळण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी तैनात आहेत.






