इम्रान अत्तार
भोर: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी दमदार हजेरी लावली. अवघ्या तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भोर शहराला जोडणाऱ्या नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी साचल्याने पुलाला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुचाकी आणि चारचाकी चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक वाहनचालकांना पाण्यातून सावधपणे वाहन चालवत मार्ग काढावा लागला. काही ठिकाणी वाहनांचे इंजिन बंद पडल्याच्या घटनाही घडल्या. पहिल्याच पावसात पुलावरील रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पुलावरील पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट पुलावर साचत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मान्सून अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नसतानाही पहिल्याच जोरदार पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात आणखी गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने पुलावरील पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या परिस्थितीचा आढावा प्रतिनिधी इमरान आतार यांनी घेतला.







