फुरसुंगी, ता. 12 : रस्त्यावर वाहतूक असल्याने कार बाजूला घेता येणार नसल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांनी एका कारचालकाला आणि मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना मंतरवाडी चौकाजवळील संग्राम बारसमोर घडली. या मारहाणीत तिघे जखमी झाले असून, कारमालकाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळीही गहाळ झाली आहे.

याप्रकरणी कल्याण विठ्ठल मोहिते (वय 40, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ऋषी सुतार, त्याचा भाऊ, हेमंत हरपळे, विशाल हरपळे आणि एका टँकरचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 115(2),118(1),189(2),190,191(2),324,351(2),352 प्रमाणे गन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिते यांच्या स्विफ्ट डिझायर कारवरील चालक वैजनाथ मुंडे हा मित्रांसह वडकी येथून दिवाळीची खरेदी करून मंतरवाडी चौकातून भेकराईनगरकडे 7 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास जात होता. त्यावेळी रिक्षाचालक ऋषी सुतार याने कार बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, रस्त्यावर वाहतूक असल्याने कार बाजूला घेता येणार नसल्याचे चालकाने सांगितल्याने वादाला सुरुवात झाली.

यानंतर ऋषी सुतार व त्याच्या भावाने वैजनाथ मुंडे याला शिवीगाळ करत मारहाण केली. ही माहिती मिळताच कारमालक कल्याण मोहिते हे मित्र अनिल केंद्रे यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी हेमंत हरपळे, विशाल हरपळे आणि एका टँकरचालकानेही वादात उडी घेतली. हेमंत हरपळे याने कमरेच्या बेल्टने, तर विशाल हरपळे याने लाकडी काठीने मोहिते व केंद्रे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच टँकरचालकाने वैजनाथ मुंडे याला कारमधून बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या हल्ल्यात अनिल केंद्रे यांच्या उजव्या डोळ्याजवळ व नाकाला, तर वैजनाथ मुंडे यांच्या कानाला व तोंडाला दुखापत झाली. मारहाण करणाऱ्यांनी तक्रार दिल्यास काहीही वाकडे करू शकत नसल्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर 112 क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपचार घेतल्यानंतर मोहिते यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मारहाण, धमकी आणि सोनसाखळी गहाळ झाल्याप्रकरणी ऋषी सुतार, त्याचा भाऊ, हेमंत हरपळे, विशाल हरपळे आणि एका टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल लारण्यात आला आहे.






