पुणे : फुरसुंगी परिसरात ताडी तयार करून तिची विक्री करणाऱ्या ठिकाणी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत ५ लाख ३३ हजार ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून फुरसुंगी परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना सर्व्हे क्रमांक २१५, महात्मा फुले वसाहत येथे ताडी तयार करून तिची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईत भिमराव यंकप्पा भंडारी (वय ७८, रा. गंगानगर, महात्मा फुले वसाहत, फुरसुंगी, मूळ रा. वडगिरी, ता. शहापूर, जि. यादगिर, कर्नाटक) आणि दिगंबर रामलिंग जंगम (वय २३, रा. गंगानगर, महात्मा फुले वसाहत, फुरसुंगी, मूळ रा. शालू गल्ली, हिरवा मारुती चौक, ता. भूम, जि. धाराशिव) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण ५ लाख ३३ हजार ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याबाबत तसेच जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गुन्हे गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-३ शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण आणि अंमली पदार्थ विरोधी पथक-२च्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.







