कुरकुंभ, ता. 1 : कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसी परिसरात परवानगीशिवाय धोकादायक रसायनांचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याचा प्रकार दौंड पोलिसांनी उघडकीस आणला. कारगील कंपनीच्या उत्तरेकडील टेकडीच्या आडोशाला केलेल्या कारवाईत 148 बॅरलमध्ये द्रवरूप रसायन, तसेच 210 रिकामे बॅरल असे एकूण 358 बॅरल आढळून आले.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 24 ऑगस्ट रोजी छापा टाकला. यावेळी महेश तात्यासो गायकवाड (वय 35, रा. कुरकुंभ) हा संबंधित जागेवर आढळून आला. त्याने गेल्या तीन महिन्यांपासून रसायनांचा साठा करत असल्याचे पोलिसांना सांगितले. हे रसायन ‘मिक्स सॉल्व्हेंट केमिकल’ असल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी रसायन साठवण्यासाठी ‘एमपीसीबी’चा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता संबंधिताकडे परवाना नसल्याचे समोर आले. परिसरात रसायन सांडल्याचेही आढळून आल्याने पर्यावरणासह मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

याप्रकरणी पोलिस अंमलदार अंकुश कृष्णा दळवी यांनी सरकारच्या वतीने दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी महेश गायकवाड याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 286, 287 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील कलम 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.








