पुणे : सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक व्हिडिओवर विश्वास ठेवणे आता चांगलेच महागात पडू शकते. पुण्यातील एका 38 वर्षीय महिलेला Instagram वर रतन टाटा यांचा बनावट Deepfake व्हिडिओ पाहणे चांगलेच महागात पडले. शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी तिच्याकडून तब्बल 4,09,100 रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या या महिलेने Instagram वर दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत मोठा परतावा मिळू शकतो, असा दावा करण्यात आला होता. प्रसिद्ध व्यक्तीचा व्हिडिओ असल्याने महिलेचा त्यावर विश्वास बसला.

व्हिडिओसोबत असलेल्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर तिला एक ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. ॲप डाउनलोड केल्यानंतर ‘मनमोहन’ नावाच्या व्यक्तीने Microsoft Teams च्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधला. शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास दुप्पट रक्कम मिळेल, असे सांगून तिला गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यात आले.

आरोपीने पाठवलेल्या वेगवेगळ्या UPI ID आणि बँक खात्यांमध्ये महिलेने टप्प्याटप्प्याने 4,09,100 रुपये जमा केले. मात्र पैसे भरल्यानंतर तिला कोणताही परतावा मिळाला नाही. काही काळाने आरोपीने संपर्कही बंद केला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.या घटनेनंतर महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.







