पुणे: पुणे शहरातील कात्रज परिसरात एका दुर्दैवी अपघाताने खळबळ उडाली आहे. कडक उन्हात झाडाच्या सावलीत विश्रांती घेणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीचा भरधाव कारने चिरडल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे. विलास मारुती धांडे असे या दुर्दैवी मृताचे नाव असून, या घटनेनंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कात्रजमधील शेलार मळा येथील महादेव मंदिर परिसरात घडली. विलास धांडे हे दुपारच्या वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली शांतपणे झोपलेले होते. यावेळी एका अज्ञात चालकाने आपली लाल रंगाची कार अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत थेट त्यांच्या अंगावर घातली. धडक इतकी भीषण होती की विलास यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडल्यानंतर कारचालकाने तिथे थांबून जखमीला मदत करण्याऐवजी पळ काढला. या प्रकरणी विलास धांडे यांचा २१ वर्षांचा मुलगा अरुण विलास धांडे याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सध्या पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरु आहे.
घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याद्वारे लाल रंगाच्या कारचा आणि चालकाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.







