दौंड, (पुणे) : पायी चालत घरी जाणाऱ्या 50 वर्षीय मजुराला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मजुराचा उपचारापूर्वीच जागीच मृत्यू झाला असून, अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. दौंड शहरातील नगरमोरी चौक रस्त्यावरील तलाठी कार्यालयासमोर हि घटना घडली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुसेन शमशुद्दीन शेख (रा. सिद्धार्थनगर, दौंड, ता. दौंड) असे अपघातात मृत पावलेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे मेहुणे जाफर महम्मद पठाण (वय 50, रा. भिमनगर, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हुसेन शेख हे सिद्धार्थनगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते व मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. दिनांकशनिवारी (ता. 04) रात्री पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास, हुसेन शेख हे नगरमोरी चौक रस्त्यावरून पायी घराच्या दिशेने जात होते. दौंड तलाठी कार्यालयाच्या समोर आले असता, मागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत हुसेन शेख हे रस्त्यावर दूरवर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
मध्यरात्री जाफर यांच्या मुलाला जमीर खान यांनी फोन करून अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच जाफर पठाण आणि सोयल यांनी तात्काळ घटनास्थळी म्हणजेच तलाठी कार्यालयासमोर धाव घेतली. तिथे आधीच पोलीस आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी हुसेन शेख हे रक्ताच्या थारोळ्यात पालथे पडलेले होते. त्यांच्या डोक्याला तसेच शरीराला मोठ्या जखमा आढळून आल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, अपघातानंतर जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता अज्ञात वाहन चालक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गाडीसह फरार झाला. जाफर पठाण यांच्या तक्रारीवरून दौंड पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.






