अमरावती: अमरावती शहरात शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली, जिथे केवळ एका छोट्या वादाचे रुपांतर भीषण हत्येत झाले. ४ जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास गर्ल्स हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर ही घटना घडली. जाहीद हुसेन रिफाकत हुसेन (वय २८) असे या मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात पोलिसांनी शेख इम्रान ऊर्फ गोलू (वय २८), शेख अमीन (वय ३४) आणि शेख समीर (वय २७) या तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जाहीद आणि त्याचे मित्र कॅम्प परिसरातील एका कॉम्प्लेक्समध्ये लुडो खेळत होते. खेळात जिंकल्यानंतर जाहीद आणि त्याचे मित्र जल्लोष करत होते. ही आरडाओरड ऐकून जवळच मद्यपान करत असलेल्या आरोपींना राग आला आणि त्यांनी वादाला सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की मुख्य आरोपी गोलूने चाकू काढून जाहीद आणि त्याच्या मित्रांना धमकावले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जाहीद पळत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला आणि चाकूने ४ गंभीर वार केले. उपचारादरम्यान जाहीदचा दुर्दैवी अंत झाला.

गुन्ह्यानंतर दोन आरोपींना घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली, परंतु मुख्य आरोपी गोलू इनोव्हा कार घेऊन फरार झाला. पोलिसांनी सुमारे १ तासाच्या थरारक पाठलागानंतर बडनेरा हायवेवरील कोंडेश्वर पॉईंटजवळ त्याला पकडले.
मुख्य आरोपी गोलू हा एक सराईत गुन्हेगार असून, २०१८ मधील एका खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला होता, परंतु सुटका झाल्याच्या काही महिन्यांतच त्याने पुन्हा हत्या केली आहे.






