उरुळी कांचन, (पुणे) : तरडे (ता. हवेली) जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनीने स्वतः लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व देशातील नामांकित ज्येष्ठ साहित्यिक राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ‘तरडे खालचे’ येथील शाळेतील चिमुरडी कु. आरोही अमोल बरकडे हिने हे पुस्तक लिहिले आहे. या कौतुकास्पद कामगिरीमुळे ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शाळेचे नाव थेट दिल्ली आणि मुंबईच्या पटलावर पोहोचले आहे.

पुण्यात पार पडलेल्या या दिमाखदार पुस्तक प्रकाशन सोहळ्याला देशातील आणि राज्यातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा तथा राज्यसभा खासदार श्रीमती स्वाती मालीवाल, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कु. आरोही हिच्या पुस्तकाचे थाटात अनावरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वेळीच ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम आदर्श शिक्षक करत असतात. कु. आरोही बरकडे हिच्यामधील सुप्त लेखिकेला ओळखण्याचे आणि तिला हे पुस्तक लिहिण्यासाठी योग्य व सातत्यपूर्ण मार्गदर्शन करण्याचे मोलाचे काम तिच्या शाळेतील मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती सरिता ननावरे मॅडम यांनी केले. पुस्तक प्रकाशनावेळी मान्यवरांच्या हस्ते आरोहीसह शिक्षिका सरिता ननावरे मॅडम यांचेही विशेष कौतुक करून मनापासून अभिनंदन करण्यात आले.






