लोणी काळभोर, ता. 13 : थेऊर येथील पॉवर हाउस परिसरात मोठा विद्युत ‘बार’ झाल्याने तारू वस्ती परिसरातील 3 घरांमधील टीव्ही, फ्रीज, संगणक, वॉटर हीटर, पीओपीमधील महागड्या लाईट्ससह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक होऊन नुकसान झाले. मंगळवारी (ता. 13) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, थेऊर येथील थेऊर येथील पॉवर हाउस परिसरात सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मोठा विद्युत ‘बार’ झाला. यावेळी 3 घरांमधील टीव्ही, फ्रीज, संगणक, वॉटर हीटर, पीओपीमधील महागड्या लाईट्ससह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान झाले. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून, महावितरणने तातडीने चौकशी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

आठ दिवसांपूर्वी पावर हाउसकडे जाणारी हाय व्होल्टेज तार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका नागरिकाच्या घरावर तुटून पडली होती. ही तार रस्त्यावर अथवा एखाद्या वाहनावर पडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. तसेच या ठिकाणी नवीन विद्युत पोल उभा करून त्यावरती दोन महिन्यापूर्वीच नवीन तार टाकण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

सहा दिवसात दुसरी घटना
तारू वस्ती परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. सुमारे पाच ते ते सहा दिवसांपूर्वी उच्चदाबाची तार सिंगल फेजच्या तारेवर पडल्याने 10 ते 12 काही घरांतील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले होते. त्या वेळीही वायरी जळणे आणि मीटरजवळ ‘बार’ होण्याचे प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. यामुळे घरगुती उपकरणे धोक्यात आली आहेत. अशा घटनांमुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, महावितरणच्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
याबाबत बोलताना अभियंता महेंद्र सिताफळे म्हणाले, “सदर ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आली. महावितरणची केबल टाकण्यात आलेली चांगल्या पद्धतीची आहे. ज्या घरमालकाला विद्युत रोहीत्रातून वीज जोडणी मीटरपर्यत देण्यात आली आहे, त्या ठिकाणपर्यत केबल चांगली आहे. केबल चांगली आहे हे त्यांना दाखवून देण्यात आली आहे. आर्थिंग उंचीवर आहे. आर्थिग खोलवर नसल्याने ही घटना झाली असा संशय आहे. घराला लागुनच महापारेषणचे मोठे सबस्टेशन आहे. महापारेषण मधून काही सप्लाय झाला आहे का याचा शोध सुरु आहे.”






