पुणे : गुटखा विक्रेत्याला कारवाईची भीती दाखवून १ लाख ६५ हजार रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप असलेल्या पोलीस अंमलदाराला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी ही कारवाई केली. या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

रामकिशन धोंडिबा हंबर्डे असे निलंबित पोलीस अंमलदाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामकिशन हंबर्डे आणि सतीश मोरे यांनी संगनमत करून फुरसुंगी परिसरातील एका गुटखा विक्रेत्याला कारवाईची धमकी दिली. त्याच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १ लाख ६५ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ११ ऑक्टोबर २०२६ रोजी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अवैध गुटख्यावरील कारवाईची भीती दाखवून संबंधित विक्रेत्याकडून एक किलो काजू-बदामही नेल्याची तक्रार समोर आली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला.

या प्रकरणाबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अहवाल सादर केला होता. संबंधित प्रकारामुळे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या वर्तनाबाबत जनमानसात प्रश्न निर्माण होण्याची तसेच पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी रामकिशन हंबर्डे यांना तडकाफडकी निलंबित केले. या प्रकरणातील आरोपांबाबत पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.






