ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी तब्बल दोन आठवड्यांनंतर शिवसेनेच्या नगरसेविका आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची ठाणे गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना अटक झाल्यानंतर राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या चौकशीतून काय माहिती समोर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी वडिलांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. गरज पडल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर २४ तासांच्या आत ठाणे गुन्हे शाखेने राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी बोलावले.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू जयनाथ आणि पुत्र राम यांनी मीनाक्षी शिंदे व राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणातील काही आरोपींसोबत राजेंद्र शिंदे यांचे फोटो समोर आल्याचा दावाही करण्यात आला होता. शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी हत्येच्या दुसऱ्या दिवशी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन शिंदे दाम्पत्याची नावे पुरवणी एफआयआरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या नावांचा पुरवणी जबाबात समावेश करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, चौकशीसाठी न बोलावल्याने पूर्णेकर कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन मीनाक्षी शिंदे यांनी या हत्येशी आपला किंवा आपल्या कुटुंबाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रदीप पूर्णेकर यांची हत्या दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी पोलीस आयुक्तांना निष्पक्ष चौकशीचे निर्देश दिल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही आणि सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.








