पुणे : सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याच्या आरोपातून विवाहित महिला पायल झांबरे यांनी आत्महत्या केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ऐन दिवाळीच्या काळात घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी पायल झांबरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या कथित जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींना अटक केली असून, त्यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
या प्रकरणातील तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्याने आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. सासरे अरविंद झांबरे आणि सासू मंगल झांबरे यांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात नणंदेला अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

झांबरे कुटुंबाचे वकील पुष्कर पाटील यांनी न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती दिली. या प्रकरणात अनेक दावे खोटे असल्याचे त्यांनी म्हटले. पायल यांनी घरात आत्महत्या केल्याच्या घटनेचे पुनर्निर्माण (सीन रिक्रिएशन) करणे आवश्यक असून, पायल यांच्यासह संबंधित तिघांचे मोबाईल तपासायचे आहेत. तपासासाठी पोलिसांना आणखी वेळ हवा असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत असून, तपासातून नेमके काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.






