नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता जमा होऊनही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप 2,000 रुपये पोहोचलेले नाहीत. त्यामुळे पैसे कधी मिळणार, हप्ता नेमका कोणत्या कारणामुळे अडकला आणि आता काय करावे, असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहेत. मात्र, काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

योजनेचा 24 वा हप्ता वितरित केला. यावेळी देशातील 9.34 कोटींपेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांसाठी 18,690 कोटी रुपयांहून अधिक निधी जारी करण्यात आला. प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात 2,000 रुपये पाठवण्यात आले.
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम एकाच वेळी न देता 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते.

तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर ‘Know Your Status’ हा पर्याय निवडा. येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरून मोबाईलवर आलेला OTP नोंदवा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हप्त्याची सद्यस्थिती समजू शकते.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते आधारशी जोडलेले असावे. शेतजमिनीच्या नोंदींची पडताळणीही पूर्ण झालेली असणे गरजेचे आहे. तुमचा हप्ता अडकला असल्यास पीएम किसानच्या 155261 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून कारण जाणून घ्या.







