लोणी काळभोर: देवदर्शन करून माघारी (Haveli News) परतताना कार व ट्रकचा (Pune News) अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथे सोमवारी (ता.1) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोन महिला जखमी झाल्या असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Accident)

जनाबाई कडुबा पारखे (वय 82, रा. महाल किनोळा, ता. फुलंबरी, जि. छत्रपती संभाजीनगर) व शिलाबाई कैलास आरते (वय 50, रा. खराडी, पुणे) अशी जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. तर सतिश सर्जेराव सावंत (वय 34, रा. मु.पो. अरण ता. माढा जि. सोलापुर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी जालिंदर कैलास आरते (वय 29, रा. सृष्टी, अप्पर खराडी, ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जालिंदर आरते हे कुटुंबासोबत देवदर्शनाला गेले होते. देवदर्शनाचा कार्यक्रम आटोपून आरते हे राहत्या घरी खराडीकडे बलोना कारने चालले होते. त्यांची गाडी थेऊर फाटा येथे आली असता, त्याच्या कारला अशोक लेलंड कंपनीच्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी जालिंदर आरते यांची गाडीत बसलेली आई मिलाबाई आरते यांना मुका मार तर आजी जनाबाई पारखे यांच्या मानेला दुखापत झाली आहे.
दरम्यान, या अपघातात बलोना कारच्या मागील बाजुची पूर्ण काच फुटून, डिक्की बेंड झाली आहे. तसेच कारचा मागील कॅमेरा, ब्रेक लाईट्स फुटले आहे. तसेच पुढील बाजुचे बॉनेट बेंड होऊन गाडीचे नुकसान झाले आहे. ट्रकचालक सतिश सावंत याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवल्यामुळे अपघात घडला असून दोन महिला जखमी होऊन गाडीचेही नुकसान झाले आहे.
याप्रकरणी जालिंदर आरते यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक सतिश सावंत याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 (क), 324(4), 351(2) (3), 352 व मोटार वाहन कायदा कलम 184, 3(1),181, 5/180, 119/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वैशाली नागवडे करीत आहेत.







