पुणे : ऑनलाइन गेमच्या माध्यमातून झालेल्या वादातून पुण्यातील एका तरुणाला काही तरुणांनी मारहाण केल्याची तक्रार घेऊन त्याचे आई-वडील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित जनता दरबारात दाखल झाले. मुलावर झालेल्या अन्यायाची माहिती देत त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे न्यायाची मागणी केली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी पालकांचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकून घेत प्रकरणाची तातडीने दखल घेतली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. संबंधित प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. तसेच तरुणाईला चुकीच्या दिशेने नेणाऱ्या आणि हिंसक प्रवृत्तींना प्रोत्साहन देणाऱ्या ऑनलाइन गेम्सबाबतही आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या विविध भागांतून नागरिक या जनता दरबारात आपल्या समस्या घेऊन आले होते. वैयक्तिक अडचणी, प्रशासकीय प्रश्न तसेच स्थानिक पातळीवरील प्रलंबित कामांबाबत नागरिकांनी निवेदने सादर केली.

सुनेत्रा पवार यांनी उपस्थित नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विविध प्रकरणांवर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या प्रश्नांकडे केवळ ऐकून न पाहता त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, यावर त्यांनी भर दिला.
जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही प्राथमिकता असल्याचे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.







