मावळ : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी बस ही आजही प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त प्रवास करणाऱ्या लोकांना एसटीचा मोठा आधार असतो. आता मावळ तालुक्यातील एसटी प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. तालुक्यातील 9 प्रमुख ठिकाणी अत्याधुनिक प्रवासी निवारा बस थांबे उभारण्यात येणार आहेत.

या कामांसाठी प्रत्येक ठिकाणी 20 लाख रुपये याप्रमाणे एकूण 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आमदार सुनील शेळके यांनी या निधीसाठी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
कोणत्या 9 ठिकाणी उभारणार बस थांबे?
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, कामशेत, वडगाव मावळ, सोमाटणे फाटा, कान्हे फाटा, वडेश्वर, पवनानगर, इंदुरी आणि खंडाळा या ठिकाणी नवीन बस थांबे बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक बस थांब्यासाठी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात अनेक बस थांब्यांवर प्रवाशांसाठी पुरेशी व्यवस्था नसते. त्यामुळे उन्हाळा, पाऊस आणि थंडीच्या दिवसांत बसची वाट पाहताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. नवीन बस थांबे उभारल्यानंतर प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी सुरक्षित आणि आरामदायी जागा उपलब्ध होण्यास मदत होईल.






