पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या मार्गावरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही 2 मेट्रो स्थानके बुधवार, 25 नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी खुली होणार आहेत. दुपारी 3.30 वाजल्यापासून या स्थानकांवरून प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरू झालेल्या स्थानकांची संख्या आता 19 झाली आहे.

सुरुवातीला 23 पैकी 17 स्थानकांवर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली होती. आता बालेवाडीतील दोन्ही स्थानकांना रेल्वे सुरक्षा मंडळाची परवानगी मिळाल्याने तीही सेवेत दाखल होत आहेत. उर्वरित 4 स्थानके लवकरच सुरू करण्याचे नियोजन आहे. या मार्गावर सध्या दररोज जवळपास 50 हजार प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
सध्या पुणे मेट्रोच्या लाइन 3 वर 20 गाड्यांच्या माध्यमातून दररोज सुमारे 300 फेऱ्या चालवल्या जात आहेत. गर्दीच्या वेळेत दर 5 मिनिटांनी, तर इतर वेळेत दर 8 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध आहे. प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून सुमारे 99 टक्के गाड्या वेळेवर धावत असल्याचे प्रशासनाने सांगितले. सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर प्रवासामुळे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.







