पुणे: गुगलवर प्रसिद्ध मद्यविक्री दुकानाच्या नावाने बनावट पेज आणि वेबसाइट तयार करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. कल्याणीनगर परिसरातील एका नामांकित मद्यविक्री दुकानाच्या नावाचा गैरवापर करून सायबर गुन्हेगारांनी मद्य घरपोच देण्याचे आमिष दाखवले. या माध्यमातून 15 ते 20 ग्राहकांना जवळपास 1 लाख रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यापासून 12 नोव्हेंबरपर्यंत हा प्रकार सुरू होता.

आरोपींनी संबंधित दुकानाच्या नावाशी साम्य असलेले बनावट गुगल पेज आणि वेबसाइट तयार केली होती. त्यावर मद्य खरेदी करता येईल आणि घरपोच सेवा मिळेल, अशी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे मद्य मागवू इच्छिणारे अनेक ग्राहक या पेजवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत होते.
ग्राहकांनी संपर्क केल्यानंतर आरोपी त्यांना ऑनलाइन पैसे भरण्यास सांगत असत. त्यासाठी त्यांच्या मोबाईलवर क्यूआर कोड पाठवला जात होता. गुगलवर दुकानाचे नाव आणि माहिती दिसत असल्याने ग्राहकांचा या पेजवर विश्वास बसत होता. मात्र, क्यूआर कोड स्कॅन करून पैसे भरल्यानंतरही ग्राहकांना मद्याची डिलिव्हरी मिळत नव्हती. पैसे मिळाल्यानंतर आरोपी संपर्क टाळत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात आले.

या प्रकरणी अर्जुन चव्हाण (वय 35) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी मोबाईलधारक आणि बनावट वेबसाइट तयार करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या सायबर फसवणुकीमागे कोण आहे, तसेच पैसे कोणत्या खात्यांमध्ये जमा झाले, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांनी संबंधित दुकानाची अधिकृत वेबसाइट आणि संपर्क क्रमांक तपासणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीकडून आलेला क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.






