शिरूर: पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात शुक्रवारी सकाळी गोळीबाराची गंभीर घटना घडली. लाटेआळी येथील डॉ. आंबेडकर नगर परिसरात एका 33 वर्षीय तरुणावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या हल्ल्यात हरीश गंगावणे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हरीश गंगावणे हा शहरात बिअर बार चालवत होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्याच्या बारमध्ये काही तरुण दारू पिण्यासाठी आले होते. त्यावेळी बिलाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर हरीशने संबंधित तरुणांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. त्याच घटनेचा राग मनात ठेवून हल्ला करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.

गुरुवारी लाटेआळी परिसरातील डॉ. आंबेडकर चौकात गणेशोत्सव मंडळाजवळ हरीश आणि संशयित आरोपी पुन्हा समोरासमोर आले. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. शिवीगाळही झाल्याची माहिती आहे. त्यावेळी मंडळासमोरून पोलिसांची गस्त सुरू होती. त्यामुळे मंडळातील काही तरुणांनी मध्यस्थी करून वाद थांबवला आणि दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना वेगळे केले.

मात्र, त्यानंतर हरीश आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून तेथून निघाला. याच वेळी दबा धरून बसलेल्या रोहित सोनवणे, अनिकेत गव्हाणे आणि आदित्य पवार यांनी त्याच्यावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. गावठी पिस्तुलातून जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. यातील एक गोळी कानामागून मानेत गेली, तर दुसरी गोळी त्याच्या दंडाला चाटून गेली.
या घटनेनंतर तिन्ही संशयित आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.







