पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरदवाडी परिसरात एका पित्यानेच आपल्या 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार जवळपास वर्षभर सुरू असल्याची माहिती पोलिसांत दाखल तक्रारीत देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी मूळचा पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. त्याने मुलीला धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर या कृत्याचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रित करून ते स्वतःकडे सेव्ह करून ठेवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मात्र, काही काळानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरूर पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अल्पवयीन मुलीची ओळख आणि तिची गोपनीयता सुरक्षित राहावी, यासाठी तिच्याशी संबंधित कोणतीही वैयक्तिक माहिती उघड करण्यात आलेली नाही.

या घटनेनंतर सरदवाडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून तक्रारीतील सर्व बाबींची पडताळणी केली जात असून, मोबाईलमधील व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







