आदित्य बोराटे

इंदापूर: श्री संत शिरोमणी सावता महाराज पालखी पायी वारी सोहळा २०२६ (वर्ष नववे) अंतर्गत श्री क्षेत्र सासवड (ता. पुरंदर) ते श्री क्षेत्र अरण (श्रावण पायी वारी) या पायी वारीचे बुधवारी (दि.१९) इंदापूर शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरातील संत सावतामाळी मंदिर येथे पालखी काही वेळ विश्रांतीसाठी थांबली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी संख्येने गर्दी केली होती.

यावेळी समाजबांधवांच्या वतीने पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. दिलीप महाराज झगडे यांचा सन्मान करण्यात आला. झगडे यांनी सांगितले की, या पवित्र पालखी सोहळ्यात हजारो भाविक श्रद्धेने अनवाणी पायी प्रवास करीत आहेत. यामध्ये वृद्ध पुरुष, महिला तसेच नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. मात्र, वारीतील भाविकांच्या आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून पुरेशा सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी अनेक वेळा अर्जाद्वारे प्रशासनाकडे सुविधांची मागणी करूनही अपेक्षित दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. दिलीप महाराज झगडे, ॲड. सचिन राऊत, नगरसेवक भारत शिंदे व समाजसेवक महादेव शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधून वारीतील परिस्थितीची माहिती दिली.
यानंतर मंत्री गोरे यांनी तातडीने प्रशासनाला सूचना देत अवघ्या एका तासात वारीसाठी आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याचे टँकर तसेच सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून दिला. त्यामुळे वारीतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला.
तातडीने मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल ह.भ.प. दिलीप महाराज झगडे, महावीर बापू भुजबळ, राजाभाऊ अडसूळ, राजेंद्र तरटे, भानुदास बापू हिंगणे, नगरसेविका वंदना शिंदे, ॲड. सचिन राऊत, सामाजिक कार्यकर्ते भारत शिंदे, महादेव शिंदे, चंद्रकांत सावंत, नागेश शिंदे, सौरभ शिंदे व भारत बोराटे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.






