पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातून एक अतिशय संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची ही घटना असून, आरोपीच्या एका अतिशहाणपणापणामुळे त्याचे बिंग फुटले आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

पीडित मुलगी कांजण्या आल्यामुळे शाळेत गेली नव्हती. तिचे आई-वडील शेतात मजुरीसाठी गेले असताना, बहिणीच्या घरी कामानिमित्त आलेला साहिल खैरे या नराधमाने संधी साधली. लहान मुलीशी ओळख असल्याचा फायदा घेत त्याने तिला सायकल शिकवतो असे आमिष दाखवले आणि जवळच्या उसाच्या शेतात नेले. तिथे त्याने चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या केली.

आई-वडील घरी आल्यावर मुलगी न दिसल्याने गावात शोधाशोध सुरू झाली. आरोपी साहिल खैरे कोणतीही भीती न बाळगता गावकऱ्यांसोबत स्टूलवर बसून शोध घेण्याचे नाटक करत होता. पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना सायकलवरून जाणारी एक व्यक्ती कॅमेऱ्यात दिसली. ते पाहताच आरोपीने स्वतःहून ऐटीत म्हटले, बघा बघा मी सायकलवरून चाललोय.

त्याच्या या विनाकारण दाखवलेल्या अतिशहाणपणावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक तपास करत दुसऱ्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि दोन्ही फुटेजमधील सायकलस्वाराची शरीरयष्टी ताडून पाहिली. पोलिसांनी संशय बळावताच त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. खाकीचा हिसका दाखवताच आरोपीने पोपटासारखी सत्य वकिबले आणि गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने पोलिसांना घटनास्थळी नेले. गुऱ्हाळाच्या शेजारी असलेल्या तागाच्या शेताजवळील एका पाईपखाली त्याने चिमुकलीचा मृतदेह लपवून ठेवला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, एका नराधमाच्या विकृत कृत्यामुळे आणि त्याच्याच अतिशहाणपणाच्या एका वाक्यामुळे जुन्नर तालुका हादरला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.






