पुणे : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये अशाच एका प्रकरणात संरक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या 68 वर्षीय महिलेची तब्बल 76,22,541 रुपयांची आर्थिक फसवणूक झाली. या प्रकरणी 22 सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि त्यांचे पती दोघेही संरक्षण विभागातून निवृत्त झाले आहेत. 2 ते 9 सप्टेंबर या कालावधीत सायबर ठगांनी महिलेशी WhatsApp वर संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीने आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलेला घाबरवण्यास सुरुवात केली.

महिलेच्या आधार कार्डचा वापर करून काढलेल्या SIM कार्डवरून गंभीर गुन्हे सुरू असल्याचा दावा ठगांनी केला. या SIM क्रमांकाचा वापर दहशतवादी कारवाया आणि मनी लाँड्रिंगसाठी होत असल्याचे सांगत महिलेला अटकेची भीती दाखवण्यात आली. त्यानंतर चौकशीच्या नावाखाली ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याचे भासवण्यात आले.

कारवाई टाळण्यासाठी आणि तपास पूर्ण करण्यासाठी पैसे पाठवण्यास सांगितले गेले. घाबरलेल्या महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने 76,22,541 रुपये जमा केले. काही काळानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी या प्रकरणात बनावट बँक खातेधारक, संबंधित WhatsApp क्रमांक वापरणारे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.







