लोणी कंद, ता. 17 : चिकन सेंटरमध्ये चिकन घेतल्यानंतर मसाल्याच्या पुडीचे पैसे देण्यावरून झालेल्या वादातून कामगाराला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच ग्राहकाने दोन साथीदारांसह पुन्हा दुकानात येऊन अंड्यांचे ट्रे फोडून तोडफोड करीत दुकानदाराला मारहाण करून काऊंटरमधील मोबाईल व रोकड असा तब्बल 31 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना घडली.

लोणी कंद (ता. हवेली) हद्दीतील रामनगर परिसरात घडली. याबाबत अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश तानाजी भोगावडे (वय -52, रा. रामनगर, भोगावडे वस्ती, लोणीकंद) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोगावडे यांचा अभिषेक पोल्ट्री फार्म तसेच रामनगर येथे अभिषेक चिकन सेंटरचा व्यवसाय आहे. तक्रारीनुसार, 14 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका ग्राहकाने चिकन घेतले. त्याने मसाल्याची पुडी मागितल्याने कामगार शामउल्ला शेख याने ती दिली. मात्र, मसाल्याचे पैसे न देता ग्राहक निघून जात असल्याने कामगाराने पैसे मागितले. यावरून वाद होऊन संबंधित ग्राहकाने कामगाराच्या कानाखाली मारल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास तोच ग्राहक दोन तरुणांसह पुन्हा चिकन सेंटरमध्ये आला. त्यांनी दुकानातील अंड्यांचे ट्रे फोडून तोडफोड करण्यास सुरुवात केली. दुकानदाराने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, तिघांनी हाताने तसेच काठीने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच काऊंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेला विवो कंपनीचा मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन संबंधित व्यक्ती दुचाकीवरून पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे 10 हजार रुपये किमतीचा विवो Y16 मोबाईल आणि 21 हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयित दुचाकीचा क्रमांक MH-14-HC-5681 असल्याचे तक्रारदाराच्या निदर्शनास आले. संशयितांपैकी एकाचे नाव कृष्णा डोंगरे (रा. रामनगर, लोणीकंद) असल्याची माहिती मिळाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.







