उरुळी कांचन, (पुणे) : घरासमोरील रस्त्यावर स्वयंपाकाचे पाणी टाकल्याच्या किरकोळ कारणावरून वडाचीवाडी पेठ (ता. हवेली) येथे दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. आधीच्या तक्रारीनंतर आता दुसऱ्या बाजूनेही पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली असून, शेजाऱ्यांनी घरात घुसून महिला व तिच्या मुलाला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आशा सुखराज चौधरी (वय 42. धंदा- शेती, रा. नायगावपेठ, वडाची वाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादेव मारुती चौधरी (वय-50),नंदा महादेव चौधरी (वय-47) आणि ओमकार महादेव चौधरी (वय-22, सर्व रा. वडाची वाडी, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशा चौधरी यांचे पती 11 वर्षांपूर्वी मयत झाले असून त्या मुलगा ऋतिक (वय-25) याच्यासह वडाचीवाडी येथे राहून शेती करतात. बुधवारी (ता. 15) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आशा चौधरी या घरी एकट्याच असताना त्यांनी घरातील काम आटोपून स्वयंपाकाचे पाणी घरासमोरील रस्त्यावर टाकले. याचा राग धरून शेजारी राहणारे महादेव चौधरी यांनी “तू रोडवर पाणी का टाकलेस?” असे म्हणत त्यांना थेट अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
आशा चौधरी यांनी “मी पाणी रोडवर टाकले आहे, तुमच्या घरासमोर नाही, मला शिवीगाळ करू नका,” असे सांगताच महादेव चौधरी ,म्हणाले “तू जास्त बोलू नको, नाहीतर तुला व तुझ्या मुलाला मारून टाकीन,” अशी जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. याच दरम्यान आशा यांचा मुलगा ऋतिक हा कुंजीरवाडी येथून शेतीसाठी खत घेऊन घरी आला.
आईला होणारी शिवीगाळ पाहून महादेव यांना जाब विचारला. त्याचा राग धरून महादेव चौधरी, त्यांची पत्नी नंदा आणि मुलगा ओमकार हा हातात लाकडी काठी घेऊन धावून आले. या सर्वांनी मिळून आशा व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यात संशयित आरोपी ओमकार चौधरी याने हातात असलेल्या लाकडी काठीने आशा चौधरी यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. मारहाणीनंतर “तुम्हाला बघून घेतो,” अशी धमकी देत आरोपी निघून गेले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, पहिल्या घटनेत “माझ्या मुलाच्या गाडीवर का थुंकलात?” असा जाब विचारल्याचा राग मनात धरून शेजारी राहणाऱ्या आशा सुखराज चौधरी व मुलगा ऋतिक सुखराज चौधरी या मायलेकाने दांपत्याला रस्त्यावर गाठून लाथाबुक्क्यांनी आणि शेण काढण्याच्या दातळाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार महादेव मारुती चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेजारी राहणारे आशा सुखराज चौधरी व मुलगा ऋतिक सुखराज चौधरी मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.






