लोणी काळभोर, ता. 17 : लोणी काळभोर पोलीस ठाण्याने अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराविरोधात विशेष मोहीम राबवत गुरुवारी (दि. 16) सलग कारवाया करून सात जणांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. विविध ठिकाणी पेट्रोलिंग आणि गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत आरोपी गांजा भरलेल्या चिलीममधून अंमली पदार्थाचे सेवन करताना रंगेहात आढळून आले.

सुरज जीवन सोळंकी (25), संजू गणेश सोळंकी (27) आणि दीपक नवनाथ सोनवणे (41), लक्ष्मण सुखदेव मेटकरी (35) अनिल काशिनाथ भगत (53) किसन भिमा गुजराती (26) व सुरज जीवन सोळंकी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पहिली कारवाई कदमवाकवस्ती येथील विश्वराज हॉस्पिटलजवळील सरकारमान्य ताडी केंद्राच्या मागील मोकळ्या जागेत करण्यात आली. येथे सुरज जीवन सोळंकी, संजू गणेश सोळंकी आणि दीपक नवनाथ सोनवणे हे तिघे गांजा भरलेल्या चिलीममधून सेवन करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चिलीम जप्त केली. त्यानंतर एमआयटी कॉर्नरजवळील सोलापूर-पुणे महामार्गावरील पुलाखाली छापा टाकून लक्ष्मण सुखदेव मेटकरी आणि अनिल काशिनाथ भगतयांना गांजा ओढताना पकडण्यात आले. या कारवाईतही चिलीम जप्त करून पंचनामा करण्यात आला.
याच मोहिमेत लोणी कॉर्नर परिसरातील स्मशानभूमीलगतच्या मोकळ्या जागेत किसन भिमा गुजराती हा गांजा सेवन करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडील चिलीम आणि काडेपेटी जागीच नष्ट करून त्याच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, थेऊर फाटा ते थेऊर रोडवरील रेल्वे पुलाखाली गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत सुरज जीवन सोळंकी हा पुन्हा गांजा सेवन करताना आढळून आला. त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
या सर्व कारवाया लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप, पोलीस हवालदार आण्णा माने, सुरज कुंभार तसेच पोलीस अंमलदार प्रविण दडस, सागर धायतोंडे, गिरी, राहुल कर्डीले, विक्रम धराडे, किरण गायकवाड व त्यांच्या पथकाने केली आहे.
पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ व मनःप्रभावी द्रव्ये प्रतिबंधक कायदा (NDPS Act) कलम 27(अ) अंतर्गत गुन्हे दाखल केले असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत. स्थानिक परिसरात वाढत्या अंमली पदार्थांच्या सेवनावर अंकुश ठेवण्यासाठी अशा धडक कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.






