पुणे : वरिष्ठांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळुन एका जिल्हा परिषद शिक्षकाने आपल्या दोन चिमुरड्या मुलांसह गोदावरी नदीत कार टाकून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यामध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी या शिक्षकाने आपल्या व्हॉट्सॲपवर एक धक्कादायक स्टेटस ठेवले होते. “मित्रांनो मला माफ करा… मी माझ्या मुलांना संपवून स्वतःला संपवत आहे…” असे त्यांनी स्टेटसमध्ये लिहिले होते. तसेच हदगावचे गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्याकडून होणाऱ्या मानसिक जाचाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

सुनील मोरे असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव असून, ते मूळचे भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी होते. ते पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. मोरे यांनी मुदखेड जवळील पुणेगाव परिसरातील आमदुरा घाटावरून आपली कार थेट गोदावरी नदीच्या पात्रात वेगाने घातली. या भीषण अपघातात सुनील मोरे यांच्यासह त्यांची मुलगी सारा आणि मुलगा सुमित या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेतली. नदीचे पात्र खोल असल्याने शोधकार्यासाठी ‘एसडीआरएफ’ च्या पथकाला पाचारण करण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर नदीतून कार बाहेर काढण्यात आली, ज्यामध्ये तिघांचेही मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे मोरे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सुसाईड नोट आणि स्टेटसच्या आधारे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






