उरुळी कांचन, ता. 24 : उरुळी कांचन येथील खेळाडू धनंजय लक्ष्मण मदने यांनी नाशिक येथे झालेल्या 7 व्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स 2026 स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावत दमदार कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे राष्ट्रीय मास्टर्स गेम्ससाठी महाराष्ट्र संघात निवड झाली असून, उरुळी कांचनसह पुणे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

मदने हे इनोसंट टाइम्स स्कूलचे क्रीडाशिक्षक आहेत. त्यांनी 110 मीटर हर्डल्स, 400 मीटर हर्डल्स आणि 3000 मीटर स्टीपलचेस या तिन्ही स्पर्धांत सुवर्णपदके मिळवली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागपूर येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात त्यांची निवड झाली आहे.
मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, नाशिक येथे महाराष्ट्र मास्टर्स गेम्स असोसिएशनच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत धनंजय मदने यांनी आपल्या उत्कृष्ट शारीरिक क्षमता, वेग, तंत्र आणि अफाट मेहनतीच्या जोरावर तीनही स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली.

दरम्यान, या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक व मास्टर्स गेम्स असोसिएशनचे सचिव बाळू चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीमुळे उरुळी कांचनसह पुणे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला असून, विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.






