मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) महाकॉल नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा (एनसीएमसी) वापर करणाऱ्या सवलतधारक प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आता या कार्डमध्ये पाच रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना ५, १०, १५, २० अशा आवश्यकतेनुसार रक्कम कार्डमध्ये जमा करता येणार आहे. विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

एसटी महामंडळाच्या एनसीएमसी कार्डमध्ये रिचार्ज करताना यापूर्वी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. कार्डमध्ये टॉपअप करण्यासाठी अधिकृत एजंटला प्रत्येक व्यवहारामागे ११.८० रुपये कमिशन दिले जात होते. या रकमेत विविध करांचाही समावेश होता. त्यामुळे प्रवाशांनी रिचार्ज केलेली रक्कम आणि प्रत्यक्ष कार्डमध्ये जमा होणारी रक्कम यामध्ये तफावत निर्माण होत होती.
ही अडचण लक्षात घेऊन महामंडळाने रिचार्जच्या शुल्क व्यवस्थेत बदल केला आहे. आता अधिकृत एजंट आणि एसटी वाहकांकडून टॉपअपसाठी एकसमान शुल्क आकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवहारावर नियमानुसार कर आकारला जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ग्रामीण भागातील अनेक प्रवाशांना सवलतीनुसार कमी भाडे आकारले जाते. त्यामुळे कार्डमध्ये काही रक्कम शिल्लक राहते. अशा वेळी गरजेनुसार कमी रकमेचा रिचार्ज करता यावा, यासाठी पाच रुपयांच्या पटीत टॉपअप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अनावश्यक जास्त रक्कम कार्डमध्ये जमा करण्याची गरज राहणार नाही.
एनसीएमसी कार्ड रिचार्ज करण्यासाठी एसटी महामंडळाने भीम ॲपचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय एसटी बसमधील वाहक, बसस्थानकांवरील टॉपअप काउंटर आणि अधिकृत एजंट यांच्यामार्फतही कार्डमध्ये पैसे जमा करता येतात. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार रिचार्ज करता येणार आहे.
एसटी महामंडळाकडून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांसाठी १६ फेब्रुवारीपासून एनसीएमसी कार्डची नोंदणी आणि वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत सुमारे एक कोटी ४७ लाख सवलतधारकांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी मोठ्या संख्येने कार्ड सक्रिय झाली आहेत. नोंदणी केलेल्या सवलतधारकांना ३० दिवसांच्या आत कार्ड उपलब्ध करून देण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे.
एनसीएमसी कार्ड मिळण्यास विलंब झाल्यास नोंदणी पूर्ण केलेल्या सवलतधारकांना क्यूआर कोड असलेल्या पावतीच्या आधारे प्रवास करता येणार आहे. अधिकृत एजंटकडून या पावतीची मुद्रित प्रत घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय आधारकार्ड संलग्न करून प्रवाशांची ओळख पडताळणी आणि बायोमेट्रिक नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. भविष्यात फेस ऑथेंटिकेशनचा पर्यायही विकसित केला जात आहे. या बदलांमुळे एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना कार्ड रिचार्ज करणे अधिक सोयीचे होण्याची अपेक्षा आहे.






