दौंड, ता. 24 : उसने दिलेले 25 हजार रुपये परत मागितल्याच्या कारणावरून सहा जणांसह अन्य सात अनोळखी व्यक्तींनी दोन जीपमधून येत एका महिलेच्या घरावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना हिंगणीबेर्डी (ता. दौंड) येथे घडली. या टोळक्याने घराच्या दरवाजाची तोडफोड करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी लता चांगदेव काळे (वय 45, रा. हिंगणीबेर्डी) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुभाष विठ्ठल भोसले, नंदू सुभाष भोसले, गणेश सुभाष भोसले, आदेश राजेंद्र भोसले, बारीक राजेंद्र भोसले, गंगुबाई सुभाष भोसले आणि त्यांच्यासोबत आलेल्या सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे यांनी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी सुभाष भोसले यांच्याकडे उसने दिलेल्या 25 हजार रुपयांची परतफेड मागितली होती. याचाच राग मनात धरून त्याच दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी दोन जीपमधून एकत्रितपणे काळे यांच्या घरासमोर आले. त्यांनी घरावर दगडफेक केली, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घराच्या दरवाजाची तोडफोड करून नुकसान केले. या प्रकारामुळे काळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात 13 जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 189 (2), 190, 191(2), 324(2), 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास पोलीस हवालदार किरण पांढरे करीत आहेत.






