पुणे: दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात मध्यरात्री घडलेल्या सशस्त्र दरोडा आणि अपहरणाच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. घरात पुरुष सदस्य नसल्याची संधी साधत सशस्त्र टोळीने घरात घुसून रोख रक्कम व दागिने लुटले आणि त्यानंतर एका तरुणीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जुलैच्या मध्यरात्री ही घटना घडली. तलवारी, कोयते आणि अन्य शस्त्रे घेऊन आलेल्या आरोपींनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाची तोडफोड करत त्यांनी 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली.

दरोड्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढण्याऐवजी कुटुंबीयांना धमकावण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या तपासानुसार, मुख्य आरोपी नदीम शेख याने महिलेच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी घरातील तरुणीला जबरदस्तीने बाहेर ओढले. आईने विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी तरुणीला वाहनात बसवून तेथून पळ काढल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वेगवान कारवाई करत इरफान शेख, फैजल काझी, अश्पाक शेख आणि अरबाज शेख यांना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नदीम शेख, आफताब शेख, बादशहा शेख, शफीक मुलाणी (रा. मळद) तसेच अन्य तीन संशयित आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. भरवस्तीत घडलेल्या या गंभीर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास सुरू आहे.







