यवत (पुणे): शेतामध्ये नारळाची झाडे लावण्यासाठी चर खोदण्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील तिघांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. पाटेठाण (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. 190 येथे मंगळवारी (ता. 30) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तीन महिलांसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लालुप्रसाद मुरलीधर दरवडे (वय-33, रा. पाटेठाण, ता. दौंड) असे, मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संतोष सिताराम झुरुंगे, समिर संतोष झुरुंगे, अशोक परसराम झुरुंगे, निर्मला संतोष झुरुंगे, संदिप परसराम झुरुंगे, सपना अशोक झुरुंगे, नर्मदा परसराम झुरुंगे, अजित संतोष झुरुंगे, सर्व रा. पिलाणवाडी, ता. दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत दरवडे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लालुप्रसाद दरवडे यांचे पाटेठाण येथील गट नं. 190 मध्ये शेत आहे. मंगळवारी सायंकाळी लालुप्रसाद यांचे मोठे भाऊ गणेश हे शेतात जेसीबीच्या सहाय्याने नारळाची झाडे लावण्यासाठी चर काढत होते. यावेळी शेजारील वरील सर्व शेतकरी तिथे आले. “ही जमीन आमची आहे, तू या शेतात काही काम करायचे नाही,” असे म्हणून त्यांनी गणेश यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर संशयित आरोपींनी गणेश यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने डोक्यात, पाठीत व हातावर मारहाण करण्यास सुरुवात केली. गणेश यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून लहान भाऊ लालुप्रसाद, आई मनिषा आणि वडील मुरलीधर दरवडे हे धावत तिथे आले. त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी यांनी लालुप्रसाद आणि त्यांच्या आई-भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर अजित संतोष झुरुंगे याने लालुप्रसाद आणि त्यांच्या आईला दगडाने मारून जखमी केले. अखेर तेथे उपस्थित असलेल्या उमेश बबन शिंदे आणि पंकज वाल्मिक झुरुंगे यांनी मध्यस्थी करत ही भांडणे सोडवली.
दरम्यान, मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दरवडे कुटुंबाने तातडीने यवत पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना प्रथमोपचारासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात पाठवले. वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर लालुप्रसाद दरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर माने करत आहेत.







