Daund Accident: दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ते चौफुला रस्त्यावर रविवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात केडगाव येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. बोरमलनाथ ओढ्यात कार पलटी झाल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले असून अपघाताची तीव्रता दिसून येत आहे. (Car overturned in stream)

या अपघातात सार्थक बारवकर, राहणार केडगाव, याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला सार्थक कडू हा युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकावर चौफुला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती केडगाव पोलिस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर वाघज यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक बारवकर आणि सार्थक कडू हे दोघेही एकत्र शिक्षण घेत होते आणि जिवलग मित्र होते. रविवारी दुपारी ते केडगावहून चौफुलाकडे कारने प्रवास करत होते. केडगाव आणि चौफुला दरम्यान असलेल्या रस्त्यावर अचानक कारचा ताबा सुटला आणि वाहन थेट बोरमलनाथ ओढ्यात जाऊन पलटी झाले. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच केडगाव आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी आणि चौफुला येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने जमा झाले. जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमा झाल्याने डॉक्टरांनी सार्थक बारवकर याला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे केडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तरुण वयात मित्राचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. केडगाव पोलिस चौकीच्या वतीने या अपघाताचा पुढील तपास सुरू असून नेमका अपघात कशामुळे झाला, याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.







