Viral Video : आजकाल प्रवास सोपा आणि सुरक्षित वाटावा म्हणून बऱ्याच जणांकडून कॅबचा वापर केला जातो. विशेषतः रात्री उशिरा ऑफिसमधून घरी जाताना महिलांसाठी कॅब हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Viral Video)

या व्हिडीओमध्ये एक महिला रडताना दिसत आहे. तिच्या म्हणण्यानुसार, रॅपिडो कॅबमधील ड्रायव्हरने तिच्याशी अत्यंत वाईट वर्तन केलं. शिवीगाळ केली आणि अखेर तिला रात्रीच्या अंधारात भर रस्त्यावर गाडीतून उतरवून दिलं. हा प्रकार पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.
नेमकं घडलं तरी काय?
ही घटना १५ डिसेंबर रोजी घडली. गुरुग्राममधील ही महिला @stargirl_on_the_go या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपला अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून सांगते. कॅबमध्ये प्रवास करत असताना ती फोनवर बोलत होती. त्यावेळी कॅबमध्ये म्युझिक खूपच मोठ्या आवाजात सुरू होतं. तिने ड्रायव्हरला आवाज कमी करायला सांगितलं. दोनदा सांगूनही ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं.
तिसऱ्यांदा जेव्हा तिने पुन्हा आवाज कमी करण्याची विनंती केली, तेव्हा ड्रायव्हर चिडला. त्याने महिलेला अपशब्द वापरले आणि अतिशय खालच्या पातळीवर बोलत म्हणाला,
“तुझ्या बापाची गाडी आहे का? फोनवर बोलायचं असेल तर उतर आणि आपल्या बापाच्या गाडीत बस.”
रात्री रस्त्यात उतरवलं
व्हायरल व्हिडीओमध्ये महिला खूपच घाबरलेली दिसते. ड्रायव्हरने तिला थंडीत, रात्री रस्त्याच्या मधोमध उतरवलं. महिलेनं दुसरी कॅब येईपर्यंत गाडीतच थांबू दे अशी विनंती केली, पण ड्रायव्हरने ‘आता तू पाहा’ असं म्हणत अचानक गाडी वेगात चालवायला सुरुवात केली.
महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने कसंबसं गाडी थांबवली आणि स्वतःचा जीव वाचवत बाहेर पडली.
पोलीस ठाण्यातही त्रास
धक्कादायक बाब म्हणजे, महिला जेव्हा तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेली, तेव्हा तिला अपेक्षित मदत मिळाली नाही. उलट प्रकरण मिटवण्याचा दबाव टाकण्यात आला, असा तिचा आरोप आहे. मात्र तिने हार मानली नाही. तिने आपल्या आई आणि बहिणीलाही बोलावून घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी थेट जिल्हा न्यायालयात जाऊन ड्रायव्हरविरोधात केस दाखल केली.
व्हिडीओ प्रचंड व्हायरल
हा व्हिडीओ आतापर्यंत सुमारे १.५ कोटी लोकांनी पाहिला आहे. २६ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोकांचा संताप स्पष्ट दिसतोय. अनेकांनी रॅपिडोला टॅग करत ड्रायव्हरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हा प्रकार पाहता, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे विचारात घेण्याची गरज असल्याचं अनेकांचं मत आहे.







