हवामान अंदाज: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या प्रणालीचे आज चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते, तर 17 नोव्हेंबरपर्यंत ते तीव्र चक्रीवादळ बनण्याचा अंदाज आहे. या वादळामुळे देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरी आणि केरळ या 9 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाची शक्यता आहे. वादळाची हालचाल बंगालच्या उपसागरात सुरू राहिल्याने समुद्रकिनारी वाऱ्यांचा वेग वाढू शकतो. आग्नेय बंगालच्या उपसागरात वारे ताशी 55 ते 65 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 75 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.
दरम्यान, महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा विशेष परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात सध्या पावसासाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मात्र, पुढील 2 ते 3 दिवसांत थंडीचा प्रभाव वाढू शकतो.

राज्यात दिवसा उन्हाचा चटका जाणवत असला, तरी पहाटे आणि रात्री तापमानात घट होत आहे. कोकणात कमाल तापमान 33 आणि किमान तापमान 19 अंशांच्या आसपास राहू शकते. उत्तर महाराष्ट्रात रात्रीचा पारा 15 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत किमान तापमान 12 अंशांपर्यंत खाली येऊ शकते. मराठवाड्यात कमाल तापमान 34, तर किमान तापमान 20 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात प्रामुख्याने कोरडे आणि निरभ्र हवामान कायम राहील. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची चिंता नसली, तरी वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी.







