लोणी काळभोर, ता. 14: लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जय भवानी ग्रुपच्या शिवप्रेमी तरुणांकडून यंदाची शिवजयंती सामाजिक उपक्रमांसह उत्साहात साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने गुरुवार, 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता पाषाणकर बाग येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक व संगीतकार अवधूत गांधी यांनी शेर शिवराज, फत्तेशिकस्त, सुबेदार, पावनखिंड या चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांचा लाईव्ह संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच बुधवारी (ता. 18 फेब्रुवारी) सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक ॲड. श्रीयश राहुल काळभोर यांनी दिली.

“स्त्री सन्मान, शिक्षण आणि समाजप्रबोधन” हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार आजही प्रेरणादायी आहे. “एक माता शिकली, तर संपूर्ण कुटुंब शिकते” या महाराजांच्या संदेशाचा वारसा जय भवानी ग्रुप जपत आहे. मागील सहा वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवजन्मोत्सव साजरा केला जात आहे. महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सातत्याने सुरू असून दरवर्षी वेगळ्या सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली जाते. गेल्या वर्षी तब्बल 150 विद्यार्थिनींना प्रत्येकी 3 हजार रुपयांची शिष्यवृत्ती तसेच वर्षभराचे शालेय साहित्य देण्यात आले होते.
दरम्यान, रांगोळी स्पर्धेसाठी नावनोंदणीसाठी निलेश काळभोर (7972041212), विनय वजरीनकर (9615157001) व भार्गव दौंडकर (8788817621) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जय भवानी ग्रुप व मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर संगीत, कला आणि समाजसेवेचा संगम साधणारा हा उपक्रम नागरिकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
स्पर्धेचे प्रमुख नियम
1) स्पर्धा पूर्णतः विनामूल्य
2) देव, महापुरुष, नेते, संत किंवा ऐतिहासिक व्यक्तींची रांगोळी काढण्यास मनाई
3) स्पर्धा फक्त लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावांपुरती मर्यादित
4) परिक्षकांचा निर्णय अंतिम
5) आवडत्या विषयावर रांगोळी काढण्यास मुभा
6) एका रांगोळीसाठी एकच स्पर्धक ग्राह्य
7) सर्व वयोगटातील महिला सहभागी होऊ शकतात
8) आवश्यक साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणणे बंधनकारक
9) दिलेल्या वेळेत उपस्थित राहून ठराविक वेळेत रांगोळी पूर्ण करणे आवश्यक







