आदित्य बोराटे

इंदापूर: ट्रॅक्टरच्या व्यवहारातून आणि सोन्याच्या दागिन्यांच्या पैशांच्या वादातून एका 29 वर्षीय तरुणाचे अपहरण करून तब्बल वीस तास वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत बेदम मारहाण केल्याची आणि 50 हजार रुपयांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात इंदापुर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सोहेल शौकत शेख (वय 29, रा. भरणेवाडी, अंथुर्णे, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी 8 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजल्यापासून ते 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत आरोपींनी त्यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून विविध ठिकाणी नेले. गलांडवाडी क्रमांक 1 येथील हॉटेल, इंदापूरमधील व्ही. पी. कॉलेज परिसर, बिजवडी येथील जंगल भाग तसेच गागरगाव हद्दीतील सोलापूर-पुणे महामार्गालगतच्या परिसरात दगड व हाताने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
“जिवंत सोडणार नाही, हातपाय तोडू,” अशी धमकी देत आरोपींनी पैशांची मागणी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच त्यांचा मोबाईल हिसकावून घेत 50 हजार रुपये रोख स्वरूपात खंडणी उकळल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी साधु पवार, उमेश पवार, मारुती वाघमोडे, विशाल पवार आणि भैय्या पासगे यांच्याविरोधात अपहरण, मारहाण, जीवे मारण्याची धमकी व खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार साळवे यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लेंडवे करत आहेत.
दिवसाढवळ्या तरुणाचे अपहरण करून मारहाण व खंडणी उकळल्याच्या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.







