पुणे, ता. १० : पुणे शहरातील घरफोडी व चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून पाहिजे असलेल्या सराईत आरोपीसह आंतरराज्यीय टोळीतील चार जणांना विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाने उंड्री-पिसोळी परिसरातून जेरबंद केले. आरोपींच्या चौकशीत पुणे शहरातील तब्बल नऊ घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ३७ लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अज्ञात चोरट्यांनी घरमालक घरात नसताना घराचा दरवाजा तोडून चोरी केली होती. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्यामार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपी उंड्री-पिसोळी परिसरात असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र, आरोपी सराईत असल्याने ते वारंवार ठिकाण बदलत होते.

दरम्यान, आरोपी रेनॉल्ट कंपनीच्या क्विड कारमधून उंड्री-पिसोळी येथील डोंगराच्या रस्त्याने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तपास पथकाने संबंधित वाहनाला चारही बाजूंनी घेराव घालत अचानक छापा टाकला आणि वाहनातील चारही संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शंकरसिंग ऊर्फ कुणालसिंग जितेंद्रसिंग जुनी (वय २७, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे), रणबीरसिंग धनसिंग बावरी शिकलीगर (वय २६, रा. एकता नगर, बडोदा, गुजरात), अक्षयसिंग ऊर्फ अक्षय बिरुसिंग जुनी (वय २२, रा. बिराजदार नगर, हडपसर, पुणे) आणि सोनुसिंग शाखासिंग शिकलीगर/तीलपिटीया (वय २२, रा. एकता नगर, बडोदा, गुजरात) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासात त्यांनी पुणे शहरातील एकूण नऊ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. काळेपडळ आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत आरोपींकडून जवळपास ३७ लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ओळख लपविण्यासाठी विग आणि मास्कचा वापर
आरोपी चोरी करताना आपली ओळख लपविण्यासाठी डोक्यावर केसांचा टोप (विग) तसेच तोंडाला मास्क वापरत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्या हालचालींचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान, आरोपी शंकरसिंग जुनी हा भारती विद्यापीठ, आंबेगाव आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून पाहिजे आरोपी होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भिंगारदिवे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) रमेश लाहिगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मेहबुब मोकाशी तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम, नितीन मुंढे, अमोल भोसले, महेश कदम, शशीकांत दरेकर, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवा गायकवाड, अर्जुन थोरात, सागर मोरे, फिरोज इनामदार आणि नितीन बाबर यांनी ही कारवाई यशस्वी केली.






