अक्षय टेमगिरे

शिरूर : शिरूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अवैधरित्या गावठी पिस्तुले बाळगणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळत तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण 1 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली असुन पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व डीबी पथकातील कर्मचारी 14 जून रोजी रात्री गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितेश थोरात यांना गोपनीय माहिती मिळाली की, विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे वय 31, रा. आमदाबाद, ता. शिरूर हा न्हावरे-तळेगाव ढमढेरे रोडलगत असलेल्या बसथांब्याजवळ पिस्तूल घेऊन फिरत आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने न्हावरे येथील मंडल अधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत सापळा रचून विजय शेंडगे याला ताब्यात घेतले आहे.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात शस्त्र नियमांच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासात आरोपी विजय शेंडगे याने दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे बापू कोंडीबा पारखे वय 31, रा. सरकेवस्ती, निमोणे, ता. शिरूर याच्याकडे दिल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बापू पारखे याच्याकडूनही दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, मुख्य आरोपी विजय उर्फ कोयत्या शेंडगे याच्यावर यापूर्वी खून, जबरी चोरी, विनयभंग आणि मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे शिरूर व शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार अक्षय कळमकर तसेच नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रायडे, सचिन भोई, अंबादास थोरे, रविंद्र काळे, अजय पाटील व दादाराव नागरे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली आहे.







