पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील मध्यवर्ती भोजनगृह (रिफेक्टरी) चालवणाऱ्या मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस या आस्थापनेचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या तपासणीत अन्न सुरक्षिततेशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

16 जून 2026 रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी भोजनगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता आणि अन्न हाताळणी प्रक्रियेत गंभीर अनियमितता असल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याचे आढळले. तसेच अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली तापमान नियंत्रण व्यवस्था पुरेशी नसल्याचेही समोर आले.

याशिवाय भोजनगृहात कीटक प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव, अस्वच्छ परिसर, कीटक नियंत्रणातील त्रुटी, वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भातील आवश्यक नोंदी उपलब्ध नसणे आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचे अभिलेख नसणे अशा अनेक बाबी तपासणीत आढळून आल्या. या त्रुटींमुळे अन्नाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या भोजनगृहाबाबत समाजमाध्यमांवर विविध तक्रारी करण्यात येत होत्या. मेसमधील अन्नामध्ये झुरळे आणि अळ्या आढळल्याचे आरोप करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी अस्वच्छता आणि शिळे अन्न दिले जात असल्याची तक्रार करत आंदोलनही केले होते. या तक्रारींची दखल घेत अन्न सुरक्षा विभागाने तपासणी केली.
तपासणीत आढळलेल्या अनियमिततांचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित भोजनगृह सुरू ठेवणे हे ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी नोंदवला आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायिकांचे परवाने व नोंदणी) विनियम, 2011 मधील विनियम 2.1.8(4) अंतर्गत मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस यांचा अन्न नोंदणी क्रमांक 21526035002227 पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
संबंधित आस्थापनेने आवश्यक सुधारणा करून अन्न सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. या कारवाईमुळे विद्यापीठातील खाद्यसेवा व्यवस्थेच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.







