पुणे: मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. मुंबई-पुणे बुलेट ट्रेन प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटांत करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाइन उपस्थित राहून ही माहिती दिली. तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून हिरवा झेंडा दाखवत रेल्वे सेवेचा शुभारंभ केला.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, मुंबई-पुणे बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे राज्याच्या वाहतूक आणि संपर्क व्यवस्थेला नवी गती मिळेल. सध्या मुंबई ते पुणे प्रवासासाठी साधारण 3 ते 4 तास लागतात. मात्र बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हे अंतर केवळ 48 मिनिटांत पार करता येणार आहे.
तसेच भविष्यात मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्ग विकसित करण्याचे नियोजन असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या प्रकल्पामुळे पुणे ते हैदराबाद प्रवास सुमारे 2 तासांत पूर्ण होऊ शकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मुंबई-पुणे मार्गावरील तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन तसेच आगामी बुलेट ट्रेन प्रकल्प राज्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देतील. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
राज्यातील 129 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून त्यापैकी 93 स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय महाराष्ट्रात सध्या 24 वंदे भारत गाड्या सुरू असून भविष्यात वंदे भारत स्लीपरसह आणखी आधुनिक रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून त्यानंतर मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद मार्गांवरही बुलेट ट्रेनचे जाळे विस्तारण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.







