पुणे: पुणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि रेल्वे सुविधांचा विस्तार करण्यासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत पुणे स्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसेच पुणे यार्ड रिमॉडेलिंग आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांची पायाभरणी करण्यात आली.

याशिवाय, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हडपसर येथून पुणे-दानापूर अमृत भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.

कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विवेक कोल्हे, विधान परिषद सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि रेल्वे प्रवाशांच्या संख्येचा उल्लेख केला. सध्या 70 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या पुण्याला अधिक सक्षम आणि आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या अनुषंगाने सुमारे 600 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे रेल्वे स्थानकावरील यार्डाचे नूतनीकरण, विद्यमान 6 प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि आणखी 6 नवीन प्लॅटफॉर्मची उभारणी यांचा समावेश आहे. त्यामुळे भविष्यात पुणे स्थानकावर एकूण 12 प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहेत.
तसेच पुणे स्थानकासाठी नवीन प्रवेशद्वार, आळंदी येथे नवीन रेल्वे टर्मिनल आणि घोरपडी येथे कोच देखभाल डेपो उभारण्याची योजना आहे. या सर्व प्रकल्पांमुळे पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार असून प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.







