Bhor News: भोर, ता. 26 : हॉटेल मालकाने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही, या रागातून कामगाराने मालकाच्या 75 वर्षीय सासऱ्याच्या डोक्यात बोथट हत्याराने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोर तालुक्यातील जांभळी परिसरात मंगळवारी (ता. 24) ते बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किसन बापू सुर्वे (वय 75, सध्या रा. जांभळी, ता. भोर, जि. पुणे; मूळ रा. भोंगवली, ता. भोर, जि. पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर सागर थापा (पूर्ण नाव व पत्ता अद्याप उपलब्ध नाही) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अनिल सखाराम रसाळ (वय 48, व्यवसाय – शेती व हॉटेल, रा. जांभळी, ता. भोर, जि. पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल रसाळ यांचे नसरापूर-वेल्हा रोडवर ‘7/12 शेतकरी व्हेज-नॉनव्हेज’ नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी (ता. 24) ते बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांचे सासरे किसन सुर्वे हे हॉटेलमध्ये झोपले होते. त्या वेळी हॉटेलमध्ये सागर थापा हा तरुण कामगार म्हणून कार्यरत होता.
सागर थापा याने रसाळ यांच्याकडे मोबाईल घेऊन देण्याची मागणी केली होती; मात्र ती पूर्ण न झाल्याने त्याने राग मनात धरला. रसाळ हॉटेलमध्ये नसताना त्याने त्यांच्या सासऱ्यावर बोथट हत्याराने गंभीर वार केले. या हल्ल्यात सुर्वे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी सागर थापा घटनास्थळावरून फरार झाला.
दरम्यान, सकाळी हॉटेल उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अनिल रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 (खून) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. राजगड पोलीस ठाण्याचे पथक आरोपीचा शोध घेत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.







