विशाल शिंदे

भोर: सातारा-पुणे महामार्गावर वेळ (ता. भोर) गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 14 जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या प्रकरणाची नोंद राजगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (Bhor Accident)
या अपघातात गणपत पांडुरंग इमडे (वय 37, रा. स्मृती व्हीला, फेज-3, फ्लॅट नं. 403, खोपडे नगर, गुजरवाडी, पुणे, मूळ रा. शिकारा, ता. मुखेड, जि. नांदेड) यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांचे भाऊ शंकर पांडुरंग इमडे (वय 40, व्यवसाय शेती, रा. शिकारा, ता. मुखेड, जि. नांदेड) यांनी तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 5.10 वाजण्याच्या सुमारास वेळ गावच्या हद्दीत हुंडाई शोरूमसमोर सातारा-पुणे महामार्गावर हा अपघात झाला. आरोपी विवेक विजय गवळी (रा. आण्णाभाऊ साठे चौक, रामनगर बाड, वारजे माळवाडी, पुणे) हा त्याच्या ताब्यातील तीनचाकी टेम्पो साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता.
रहदारीचे नियम धाब्यावर बसवत चालवलेल्या टेम्पोने पुण्याकडे जाणाऱ्या गणपत इमडे यांच्या शाईन दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गणपत इमडे यांना गंभीर दुखापती झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघात घडवून आणल्यानंतर टेम्पो चालकाने कोणतीही मदत न करता तसेच अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून महामार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.






